Saturday, 28 September 2013

"ती"


आई तुझ्या कुशीत यायचय मला,
कुशीत शिरून खूप खूप रडायचय मला..
या नराधमांनी केलेला अत्याचार सांगायचाय मला,
आई, खूप खूप सोसलं... मन मोकळ करायचय मला.

मन माझं खूप भेदरलं, जेव्हा या साऱ्यानी मला घेरलं,
मन माझं तेव्हाच खचलं जेव्हा माझं एकटेपण मला जाणवलं . . . 

मन माझं तेव्हाच मेलं, जेव्हा अनोळखी हातांनी, हापापल्या नजरांनी मला स्पर्शिलं,
दया करा, मला सोडा, मला वाचवा, खूप विनवण्या केल्या आई,
पण एकाही दगडाला पाझर फुटला नाही  . . . 

शरीर आलेला प्रत्येक घाव सहन करत होतं,
प्रतिकार करण्याचा वेडा प्रयत्न करत होतं  . . . 

एकामागून एक घाव होत होते,
मी मात्र जिवंतपणी, पुन्हा पुन्हा मरत होते,
आई, एवढ्यावर करुन ते थांबले नाहीत,
मला छिन्नविछिन्न करताना ते थकले नाहीत  . . .

आई, खूप खूप जगायचय मला.
शिकून खुप मोठं व्हायचय मला. . .

पण आज, मृत्यूशी झुंझ देण्याचा वेडा प्रयत्न मी करत आहे
माझी वेळ मात्र क्षणा-क्षणाने संपत आहे  . . .

आई तुझ्या कुशीत यायचय मला,
कुशीत शिरून खूप खूप रडायचय मला..

मित्रहो, ही कहाणी फ़क्त एका "ती" ची नाहिये तर त्या असंख्य "तीं"ची आहे ज्यांनी या मरणयातना जिवंतपणी सोसल्या आहेत. ज्यांनी हरवलय स्वतःचं अस्तित्व, मान- सन्मान, प्रसंगी प्राणही; केवळ  काही विकृत माणसांच्या क्षणिक हव्यासापायी.

आज म्हणायला आपण २१ व्या शतकातले पण आचार आणि विचार मात्र या आधीच्या कोणत्याही शतकाला लाजवणारे. कुठे चाललोय आपण? कुठे चाललाय आपला समाज?  आधी  "ती", मग "प्रीती राठोड - Acid हल्ला प्रकरण", "छायाचित्रकार - सामूहिक बलात्कार प्रकरण" या आणि आशा कित्येक प्रकरणांनी मन सुन्न होतय, आणि पुन्हा पुन्हा विचार करायला भाग पाड्तय; आपली वाट ही प्रगतिकडे की अधोगतिकडे? आपण भारताला सुसंस्कृत (well cultured) म्हणतो, खरच हा टेम्भा मिरवण्याचा हक्क आपल्याकडे आज आहे का? अत्यंत लाजिरवाणी  गोष्ट म्हणजे आज स्त्रीला आरक्षणासाठी नव्हे तर संरक्षणाची मागणी करावी लागतेय.  आणि त्याहुन लज्जास्पद बाब ही की अशा अमानुष कृत्य करणाऱ्या माणसांना मृत्युदंड मिळावा म्हणून अख्या देशाला अक्षरशः सरकार पुढे साकडं घालावं लागते आणि आज तब्बल ९  महिन्यांनी सरकारकडून त्या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली जाते.  पण आजही असे कित्येक गुन्हे आहेत ज्यांचा निकाल तर सोडाच  पण अशा गुन्ह्यांची नोंदही नाही; पर्यायाने त्याचे गुन्हेगार अजूनही समाजात मोकाट उजळ माथ्याने वावरतायत.

माहितीसुत्रांच्या मते १९९०-२००८ मध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमधे दुपटीने वाढ झालीये. National Crime Records Bureau च्या तपासाप्रमाणे २०११ मधे  २४,२०६ गुन्हे दाखल झालेत. आणि दाखल न झालेल्या गुन्ह्यांची संख्या ही अधिक असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हे आकडे अक्षरशः मनाला चटके लावणारे आहेत. जो पर्यन्त अशा लोकांना कड़क शासन होणार नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या अमानुष गुन्ह्यांना आळा बसणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे.
सरकारच कड़क धोरण = देशाची शिस्त; असं समीकरण लागू व्हायलाच हवे.

शासनाची भूमिका जितकी महत्वाची तितकीच तुमची आमची भूमिकाही महत्वाची आणि जबाबदारिची. आज घराघरातून स्त्रीकडे बघण्याच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याची गरज आहे. आणि ही जबाबदारी स्त्री वर्गाची तर आहेच परंतु पुरुषवर्गाची अधिक आहे अस मला वाटतं.  पूर्वापार चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार स्त्री कडे एक अबला आणि सबळ आधाराशिवाय उभी न राहू शकणारी एक वेल आणि उपभोगाची वस्तू; असच बघण्यात आलं आहे. पर्यायाने तिला कायम दुय्यम स्थानच देण्यात आलं आहे. परंतु या सर्व समज-गैरसमजांना छाटून काढत आजची स्त्री; पुरुषाच्या बरोबरीने उभी आहे; सबळ आणि आधाराशिवाय.तितक्याच ताकदीने तिने स्वतःची जबाबदारी सांभाळत पुरुषाच्या जबाबदारीचाही वाटा हसत हसत स्वीकारला आणि पेललाही. तरीही आजही तिच दुय्यम स्थान मात्र तसच आहे. आणि आजही तिच्याकडे उपभोगाची वस्तू म्हणून बघण्याच्या दृष्टीत फारसा बदल झालेला नाहि. स्त्री ही सरकार किंवा शासन यांच्या कमजोर बंदोबस्तामुळे असुरक्षित नाही, तर कुठेतरी प्रत्येक घराघरात रुजू असलेल्या अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे असुरक्षित आहे.

स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही या निसर्गाचे अविभाज्य आणि महत्वाचे घटक आहेत. मग हा भेदभाव का?? कोणा एका घटकामुळे हे रहाटगाड चालण ही अशक्यप्राय बाब आहे. तरीही एका घटकाच पारड वर आणि एकाच कायम खाली का?? ह्याच कारणांमुळे अहं भाव निर्माण होणं आणि तो दुखावला गेला कि त्याचं पर्यायाने विकृती मध्ये रुपांतरही आलच. आणि केवळ समजुतीमुळे पारड खाली असलेल्या घटकाच खच्चीकरणही. . .

मित्रहो, आज आपल्या पैकी कित्येक जण आपली पुढची पिढी घडवता आहेत. तेव्हा ही आपली नैतिक जबाबदारी बनते; की आपण पूर्वापार चालत आलेल्या काही सामाजुतींमध्ये सुधारणा करून, आवश्यक ते बदल घडवून; बलात्कार, हुंडाबळी यांसारख्या घृणास्पद गुन्ह्यांना आळा घालण्यात आपला मोलाचा वाटा उचलुयात. आपली आणि येणाऱ्या पिढीची मानसिकता बदलवूयात.

धन्यवाद!

प्राची खैरनार.

Copyright © Prachi Khairnar.