Tuesday 1 March 2016

गोष्ट तुझी. . . गोष्ट माझी!!!


नमस्कार मंडळी!! आयुष्यात अशा अनेक व्यक्ति येतात, काही आयुष्यभर सोबत राहतात, तर काही मोजक्या क्षणांच्याच सोबती असतात. अगदीच नाही म्हटलं तरीही प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ति असते जी मनात खोलवर कुठेतरी घर करून बसलेली असते. जिला रोज आठवावं अस काही नसतं पण आलीच आठवण की विसरण्यासारखही काही नसतं.  एक शेर आठवला यावरून  "नहीं आती जब उनकी याद तो बरसों नहीं आती, मगर जब याद आतें है तो अक्सर याद आते है". तर प्रत्येकाच्या आयुष्यात आलेल्या अशा त्या एका व्यक्तिकरता - "गोष्ट तुझी. . . नी गोष्ट माझी" 



गोष्ट तुझी माझी, दडलेल्या अनेक भावनांची
न उलगडलेल्या नात्याची, 
गोष्ट तुझी माझी. . .

आयुष्यभराच्या लपंडावाची,
कधी मी तुला तर कधी तू मला शोधण्याची,
क्षणिकच विसावल्या क्षणांची,
निःशब्द  त्या प्रेमाची,
गोष्ट तुझी माझी. . .

एकमेकांना शोधता शोधता
स्वतः हरवलेल्या जाणिवेची,
नकळतच वळलेल्या पावलांची,
सुरु झालेल्या नव्या लपंडावाची,
गोष्ट तुझी. . .  नी गोष्ट माझी. . .

गवसलास तुला तू की नाही,
या कायम राहिलेल्या गुपिताची,
माझ्या मात्र शोध मोहीमेला अंत नाही,
या ना खेदाची ना खंताची. . .
गोष्ट तुझी. . .  नी गोष्ट माझी. . .

काही गुपितं बंद कुपीतच बरी,
तरी, आजही मनात घर करून राहिलीयेत  खरी,
असो, तर गोष्ट तुझी नी गोष्ट माझी
आणि अबोल अशा कित्येक भावनांची. .

कधीतरी कुठल्याशा वळणावर भेट होईल का आपली?
झालीच चुकून, तर नजरेला नजर भिडेल का आपली?
या आणि अशा असंख्य प्रश्नांची,
कधीच न संपणाऱ्या लपंडावाची,
गोष्ट तुझी. .  की. .  गोष्ट फ़क्त माझी!!!


धन्यवाद!

प्राची खैरनार.



Copyright © Prachi Khairnar.