आम्ही चौघी. . . चार दिशांना कधी विखुरले गेलो,
कळलच नाही. .
धम्माल, मजा, मस्ती, मारामारी,
कोणा एकीला टारगेट करून धू-धू धुवायचं कधी विसरलो,
कळलच नाही. .
असंच कधी एकीच्या मनी आल्यावर,
वेगवेगळ्या क्षेत्रात असूनही, एकत्र बंक मारायचं
आणि नुसतं उनाडासारखे फिरायचं. .
पण. . पुन्हा तश्या कधी बागडलोच नाही. .
आम्ही चौघी. . . चार दिशांना कसे विखुरले गेलो,
कळलच नाही. .
अगदी नियमितपणे एकीच्या वाढदिवशी न चुकता हजेरी लावून,
रात्रभर दंगा करत, नुसतं हसत लोळत पडायचं. .
पण. . पुन्हा तसे कधी पडलोच नाही. .
आम्ही चौघी. . . चार दिशांना कसे विखुरले गेलो,
कळलच नाही. .
एक-एकीची लग्नं होत गेली, तरी मात्र नियमित पणे भेटायचं हं !!!
आणा-भाका घेतल्या खऱ्या. . पण संसाराच्या रगाड्यात,
असे अडकलो की त्यातून बाहेर आम्ही कधी पडलोच नाही. .
आम्ही चौघी. . . चार दिशांना कसे विखुरले गेलो,
कळलच नाही. .
साता समुद्रापार मी चाललेय, तुम्ही नाही. . तेव्हा तुम्ही मात्र भेटत रहा. .
असं बोलून एक भुर्रकन उडूनही गेली. .
आणि. . आम्ही चौघी. . . चार दिशांना कसे विखुरले गेलो,
कळलच नाही. .
अगं आज माझ्या लेकीची परीक्षा आहे, आज नवरोबांचे मित्र यायाचेत. .
अगं सासुबाईंच भजनी मंडळ जमलय . . या आणि अश्या असंख्य कारणांत,
असे हरवलो की पुन्हा एकमेकांनाच काय, स्वतःला देखील गवसलो नाही. .
आम्ही चौघी. . . चार दिशांना कसे विखुरले गेलो,
कळलच नाही. .
- प्राची खैरनार.
Copyright © Prachi Khairnar.
No comments:
Post a Comment