Saturday, 17 August 2013

मला कळ्लेलं "CORPORATE"

मित्रहो, माझी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करण्याची तशी पहिलीच वेळ, त्यामुळे इथला अनुभव तसा म्हणायला गेलं तर फारच निराळा. या आधी त्यामानाने छोट्याच ऑफिस मध्ये काम केलेलं, आणि तिथे अगदी प्यून पासून ते बॉस पर्यन्त प्रत्येकाशी खेळीमेळीचं  आणि मनमोकळ असं माणुसकीचं नातं जमलेल. त्यामुळे जरा या ऑफिस मध्ये स्वतःला ट्यून अप करताना थोड़े एक्स्ट्रा एफोर्ट्स घ्यावे लागले. :-(

अगदी सुरुवातीला असच मी आणि ऑफिस कलीग चहाच्या ब्रेक मध्ये बोलत होतो, शेवटी न राहवून मी तिला माझ्या आधीच्या ऑफिस मधला आणि या ऑफिस मधला फरक बोलून दाखवला. मी म्हणाले इथे जो तो फ़क्त तुमच्याशी कामापुरतीच बोलतो, कोणालाच कोणाची पडलेली नसते, "Everybody seems to be very Professional" तसे सगळे तुमच्याशी चांगले बोलतात पण फ़क्त तोंडावर तुमच्या मागे हेच लोक तुमच्याबद्दल काहीवाही बोलतात असं कोणातरी तिसऱ्याकडूनच तुमच्या कानावर येतं, आपल्याकडून आपली मतं काढून घेउन आपण प्रांजळपणे दिलेली मतं मसाला लावून भलत्याच अर्थाने सांगितली जातात. बॉस समोर येस सर, ओके सर करतात आणि बाहेर येउन त्यालाच इतक्या शिव्या घालतात की काही विचारता सोय नाही, इथे कामाचं आठ तासाचं गणित गणतीतच नाहीये.  तुम्ही किती efficiently काम करता यापेक्षा तुम्ही किती एक्स्ट्रा वेळ ऑफिस मध्ये थांबता यावर तुमचं valuation केलं जातं. कधी कधी In fact most of the time  तुम्हाला तुम्ही तुमच्या बॉस पेक्षा क्लाइंटचेच एम्प्लोयी असल्यासारखे वाटू लागतं.  आणि या सगळ्यामुळे मला अगदी कधीतरी कोंडल्यासारख होतं.   मी अगदी भरभरून बोलत होते तेवढ्यात लक्षात आलं माझी मैत्रीण गालातल्या गालात हसत होती, कारण विचारल्यावर फ़क्त म्हणाली "Welcome to the CORPORATE LIFE"

आज जवळ जवळ एक - दीड वर्षानंतर असं जाणवतय की आपण ज्याला कॉर्पोरेट लाइफ असं म्हणतो त्यातही दोन प्रकार मोडतात. पहिला म्हणजे स्वतःच्या मेहनतीवर, तल्लख बुद्धीवर विश्वास ठेवणारा प्रकार... हा प्रकार अत्यंत मेहनती प्रचंड कामवेडा आणि हाच गुण या लोकांचा घात करतो असं म्हटलं तर ते फार चुकीचं ठरणार नाही.  दुसरा अणि सगळ्यात घातक प्रकार म्हणजे फ़क्त स्वतःची कातडी म्हणजेच नोकरी वाचवण्याच्या प्रयत्नात बॉसच्या, क्लाइंटच्या पुढे पुढे करणारा प्रकार. आणि सगळ्यात खेदजनक बाब हीच की आज दिवसेंदिवस दुसऱ्या प्रकारात मोडणारा वर्ग वाढताना दिसतोय. आज जो तो शर्यतीत उतरलेला दिसतो ते फ़क्त स्वतःचाच विचार करण्याकरता. याच दुसऱ्या प्रकारासाठी राहून राहून मनात येतं :-

जो तो स्वतःची कातडी वाचवण्यात मग्न आहे।
याचमुळे  की काय, प्रत्येकाचं जीवन भग्न आहे।।

परोपकाराचा आता कुठे लवलेश ही नाही।
दुसऱ्याचा विचार करायला मुळी आम्हाला उसंतच नाही।।

दिवसेंदिवस न्यूनगंडाच्या भावनेत गुंफत चाललेला।
स्वतःवरच नाही त्यामुळे  स्वकर्मावारुनही विश्वास उडालेला।।

म्हणूनच की काय एका नव्या शर्यतीत उतरलेला।
पुढे जाण्याऐवजी, एकमेकांचे पाय खेचण्यात रमलेला।।

आयुष्याच्या सरतेशेवटी मात्र, स्वतःच्या जीवनाचा अर्थ उमगलेला।
स्वछंदी पाखरा ऐवजी फ़क्त आणि फ़क्त खेकड्याचे जीवन जगलेला।।



प्राची खैरनार.

Copyright © Prachi Khairnar.

No comments:

Post a Comment