Wednesday, 11 May 2016

आठवणींचं पुस्तक. . .



आज असच जरा खण आवरताना कोपऱ्यात पडलेलं एक पुस्तक हाती लागलं आणि ओठांवर नकळतच हसू उमटलं. हे पुस्तक या कोपऱ्यात कसं पडलं !! या विचारांनीच मनात गर्दी केली आणि आठवणींची गलबतं बंदरावरून अलगद सुटली. नकळतच बसलो खुर्चीत, जुन्या आठवणींमध्ये रमत. खोलीचा कोपरा आणि कोपरा बसला जणू  सिनेमा बघायला माझ्यासोबत. आराम खुर्चीच्या प्रत्येक हेलकाव्यसोबत एक एक पान उलटत होतं आणि "ती" इथेच कुठेतरी असल्याची जाणीव घट्ट करत होतं.

पुस्तकाच्या प्रत्येक पानात ती लपली होती,
जणू वाक्याच्या शब्दांवरून फिरलेल्या त्या नाजुक बोटांची ती ग्वाही होती.

तिचं हसणं, तिचं रुसणं, तिचं मनवण,
प्रत्येक पानात तिचीच एक आठवण दडली होती.

हे पुस्तक तसं आम्हा दोघांच्या ही आवडीचं,
पण त्यातली सगळी पात्र तिच्यामुळेच सजीव होती.

अमुक पात्राचं वागणं कसं वाईट, आणि त्यातला नायक किती romantic,
प्रत्येक व्यक्तीवर तिची एक विशेष टिप्पणी होती.

प्रत्येक पानाचा आपला एक वेगळाच किस्सा होता,
आणि प्रत्येक किस्स्यात तिच्या गालावरची खळी होती.

फावल्या वेळातला पानांच्या नंबर्स चा तो खेळ, आणि मी चीटिंग करूनच जिंकलो,
हे भांडून मला पटवून देण्यात जाणारा तिचा तो वेळ.

सगळंच निराळं. . तो गावच खरा निराळा,
हलकेच हसलो खरा, कोणास ठाऊक खिन्नपणे की . . . . . !!

प्रत्येक पानागणिक जीवाची घालमेल वाढत होती,
नको असलेली एक आठवण जवळ येत होती.

शेवटची काही पानं बाकी असताना लगलीच ती गुलाबाची पाकळी माझ्या हाताला,
म्हणाली होती, गुलाबाचं फूल नको तू एवढी पाकळीच ठेव माझ्या आठवणीला.

कारण विचारल्यावर तिची पडलेली ती नजर,
आजही आठवली की नकळतच खाली पडणारी माझी नजर.

आणि अचानक खालून आमच्या "सौ"चा  आवाज आला, अरे ऐकलस का! मिलिंद आलाय तुला भेटायला. . .
शेवटची पानं उलटलीच नाहीत. .  तेव्हाही आणि आजही. . .
बसव त्या पठ्ठ्याला, आलोच मी. पुन्हा एकदा मुखवटा चढला, पुन्हा एकदा पुस्तक मिटलं. . यावेळीस कदाचित कायमचं. . . .




धन्यवाद!


प्राची खैरनार.



Copyright © Prachi Khairnar.







    

No comments:

Post a Comment