जो तो आप आपल्या सोयीने चाल खेळतो
नियमांची आणि तत्वांची अहो पर्वा इथे कोण करतो?
भावना, संवेदना सगळे पुस्तकी शब्द
पैसा याने मिळत नाही मग याला हो कोण पुसतो?
आयुष्याला म्हणे संबोधतात बुद्धिबळाचा खेळ
अहो पण त्यात ही आहेच की नियम आणि तत्त्वांचा मेळ
घोडं अडीच घरातच अडतं, उंट फक्त तिरकच चालतं,
हत्ती आपला सरळ गपगुमान, हवी तितकी घरं चालण्यातच याची शान
हो हो आहे या खेळात माणसंही. . . प्यादे, वजीर, राणी आणि राजा
हुद्द्याप्रमाणे ठरली जागा आणि आपापल्या जागी उभी ठाकली प्रजा
सरसकट इथे फक्त काळे पांढरे असे दोनच गट
काळया पांढऱ्या चौकोनांच्या विश्वात उभा आमचा पट
समोरच्याच्या मनीचा ठाव इथे देखील लागत नाही
तरी एक मात्र बरं इथे मागून वार होत नाहीत
तर जिंकण वा हरणं हे ज्याच्या त्याच्या बुद्धीवर
डाव जिंकला कसा हे चाल खेळल्या चालीवर
त्यामुळे इथे सोय पाहून चालत नाही
नियम तत्व पळल्याखेरिज तुमचा निभाव लागत नाही
खऱ्या खुऱ्या आयुष्यातही येईल का खेळता बुद्धिबळ?
स्वतःच्या बुद्धीवर जगण्यास मिळेल का प्रत्येकाला बळ?
धन्यवाद!
प्राची खैरनार.
Copyright © Prachi Khairnar.
No comments:
Post a Comment